बायोगॅस संयंत्रासाठी प्रामुख्याने जनावरांचे शेण, डुकरे-कोंबड्याची विष्ठा, जनावरांचे मूत्र, शौचालय जोडलेले असल्यास मानवी विष्ठा, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ, वाया गेलेल्या भाजीपाल्यांचे बारीक तुकडे इत्यादीचा वापर करता येतो. मात्र बायोगॅस संयंत्रामध्ये ओले गवत, हिरवा पाल्याचा लागलीच वापर केल्यास गॅस प्लॅंटमध्ये आम्लता वाढण्याचा धोका असतो, म्हणून हे पदार्थ पाच दिवस चांगले कुजवून नंतर संयंत्रात सोडावे. लाभार्थीकडे जनता प्रकारचा बायोगॅस असेल तर सदर संयंत्राचे इनलेट (पूरक कुंडी) मोठे असते. बायोगॅस संयंत्रामध्ये शेणराडा किंवा इतर कुजणारे पदार्थ पाण्यासोबत त्याच्या विशिष्ट प्रमाणात घातले असता त्यांची नैसर्गिक कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. सदरची प्रक्रिया हवेच्या अनुपस्थितीत होते. कुजण्याची प्रक्रिया निर्वातीय किटाणूमुळे सुलभरीत्या होते. तयार होणारा गॅस वरच्या डोममध्ये साठविण्यात येतो. सदर गॅसमध्ये मिथेन वायू 50 ते 75 टक्के, कार्बनडाय ऑक्साईड 25 ते 50 टक्के तसेच हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजनचे प्रमाण एक टक्क्यापर्यंत असते.बायोगॅस संयंत्रातील पदार्थ कुजल्यानंतर तयार होणारी स्लरी गॅसच्या दाबामुळे बाहेर पडते. स्लरी हे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. बायोगॅस संयंत्रामध्ये कुजण्याची प्रक्रिया हवाविरहित होत असलेमुळे मानवी विष्ठा अगर इतर प्राण्याची विष्ठा वापरण्यात कोणतीच अडचण येत नाही. बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी फिनाईल, डिटर्जंट साबणाचा वापर करू नये. यामुळे निर्वातीय किटाणू मारले जाऊ शकतात, तसेच पदार्थ कुजवण्याची प्रक्रिया बंद पडू शकते.
बायोगॅस स्लरीचे खत
बायोगॅसपासून मिळणारे खत हे द्रवरूप आणि घनरूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते. सदरच्या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास खत शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते.
गोबरगॅस व लाभार्थीचे शेत यामधील अंतर जास्त असल्यास किंवा वाहतूक करण्यास अडचण असल्यास द्रवरूपातील खत शेतामध्ये नेणे अडचणीचे होईल. अशावेळी गॅसप्लॅंटजवळ खत साठविण्यासाठी खड्डा तयार करावा लागेल. खत साठविण्यासाठी आऊटलेटला लागून (रेचक कुंडी) दोन खड्डे करावे लागतील. एक खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात स्लरी सोडावी. खत वाळल्यानंतर ते हंगामानुसार शेतात वापरावे.बायोगॅससाठी जागा
बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा. बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.
बायोगॅसचे प्रकार
केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन त्याच्या बांधकामाचे नियोजन करावे. ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे. ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.
दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस कमी खर्चात होणारा बायोगॅस आहे. तो सर्वसामान्य लाभार्थीस परवडणारा आहे, मात्र या संयंत्राचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंड्याकडूनच करून घ्यावे लागते. तरंगत्या टाकीचा बायोगॅस बांधकामास खर्च बराच येतो.
बायोगॅससाठी अनुदान
ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते. याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केल्यास (उदा. – इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान देण्यात येते. आपल्याला ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे त्याचा खर्च लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असतो. बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.
बायोगॅस प्रकिया
सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात