सुतार कामाचे साहित्य

सुतारकाम : लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय. यासाठी लाकूड कापून त्याची विविध तऱ्हेने जोडरचना केली जाते. मानवाच्या रोजच्या वापराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सुतारकामाचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) जुन्या पद्घतीच्या घराला लागणारे खांब, तुळया, कैच्या व चौकटी असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे. (२) फळ्यांची दारे, खिडक्या व विभाजक पडदे अशा प्रकारचे सपाट भाग बनवून बिजागऱ्या, कड्या व अटका बसविणे. (३) खुर्च्या, टेबले व कपाटे अशा प्रकारचे साधे तसेच शोभिवंत उंची फर्निचर तयार करणे. (४) मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे, कमानीच्या व काँक्रीटच्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे. (५) शेतकामांसाठी लागणारे औत, नांगरादी लाकडी अवजारे बनविणे. (६) तेलघाणे, उखळ, जाती व चरक अशा प्रकारची लाकडी यंत्रे तयार करणे. (७) बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोड्यांच्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने बनविणे. (८) नावा, पडाव, शिडाची जहाजे व तराफे अशा प्रकारची पाण्यातील वाहने बनविणे. (९) सूत व कापड उद्योगांतील चरखे, हातमाग वगैरे साहित्य तयार करणे. (१०) पिपे, खोके व पिंजरे अशा प्रकारचे साहित्य बनविणे. (११) पांगुळगाडा वगैरे खेळण्याचे लाकडी साहित्य तयार करणे. (१२) फर्निचरासाठी लागणारे गोल छेदाचे नक्षीदार काम, लेथ यंत्रावर कातून त्यावर तेलातील रोगण (व्हॉर्निश) किंवा लाखेचे रंग बसविणे. (१३) विविध प्रकारचे पोकळ व भरीव कातकाम करणे. (१४) लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.(१५) ओतकामासाठी लागणारे नमुने व तात्पुरत्या स्वरूपाच्या पेट्या  बनविणे. (१६) रूळगाड्या, मोटारगाड्या, आगबोटी आणि विमानांमध्ये लागणारे लाकूडकाम करणे.