वृक्ष लागवडीचे नियोजन

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राज्यभर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेमधून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे.
ज्यातील हवामान, जमीन, पाण्याचा अभ्यास करून कृषी हवामान विभागानुसार वृक्ष लागवडीचे नियोजन होणे आवश्‍यक आहे. बऱ्याचदा लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रजाती, वनस्पतींची काहीवेळा निवड केली जाते. कुठल्या जागेवर कुठल्या झाडांची लागवड करावी, रोपे कशी करावी, रोपे बेणे उपलब्धता लागवडीसाठी खड्डे आकार, लागवडीची पद्धत याची माहिती असणे आवश्‍यक आहे. लागवडीनंतर पाणी, खते व्यवस्थापन, सावली, जनावरांपासून संरक्षणाचे नियोजन झाले, तर रोपवन किंवा लागवड केलेली झाडे चांगली वाढतील. त्यामुळे परिसर समृद्ध, संपन्न होण्यासाठी मदत होणार आहे. वृक्ष लागवडी वेळी बऱ्याचदा प्रदेशनिष्ठ नसलेल्या, आपल्या जंगलामध्ये न आढळणाऱ्या प्रजातींची लागवड केली जाते. पर्यावरण पूरक वनस्पतीची निवड न केल्याने अन्नसाखळ्या सुदृढ होण्याऐवजी त्यावर दुष्परिणाम होतो, असे निदर्शनास आले आहे. यासाठी पर्यावरण पूरक वनस्पतीची लागवड होणे आवश्‍यक आहे. गावाच्या परिसरात सार्वजनिक जमिनी, गायराने, शाळा, महाविद्यालय परिसर, पाण्याचे पाट, नद्या, नाले, तलाव, रस्ते, शेताचे रस्ते, शेताचे बांध, शेतातील घरे, गावातील घरे इ. ठिकाणी वनस्पतीतील गुण, गुणधर्म, आकारमान इ.चा विचार करून लागवड करणे आवश्‍यक आहे.

रोपांचे नियोजन


झाडांची निवड लागवडीपूर्वी करावी. लागवडीसाठी दर्जेदार रोपे होण्यासाठी दर्जेदार बियाणे मिळणे आवश्‍यक असते. यासाठी विद्यापीठे, सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांकडे संपर्क करणे आवश्‍यक आहे. बियाणे मिळाल्यानंतर रोपवाटिका तयार करणे हा वृक्षलागवड यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. रोपवाटिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकतो. रोपे दर्जेदार होण्यासाठी रोपे बनविण्यासाठी लागणाऱ्या पिशवी 5 x 8 सें.मी. किंवा त्यापेक्षा मोठी असणे आवश्‍यक आहे. लागवडीसाठी रोपे आकाराने मोठी, धष्टपुष्ट, दर्जेदार असणे आवश्‍यक आहे. यासाठी रोपवाटिकेसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत आवश्‍यकतेनुसार वेळोवेळी खते मिसळणे आवश्‍यक आहे. बियाणे पेरणीपूर्व त्यास संस्काराची गरज आहे किंवा नाही हे बघणे आवश्‍यक आहे. अन्यथा, बियाणे वाया जाण्याची शक्‍यता असते. बियाणे उगवून आल्यानंतर संप्रेरके, विद्राव्य खते इत्यादींची फवारणी रोपे चांगली होण्यासाठी फायदेशीर ठरते. रोपांना सावलीसाठी शेडनेटचा वापर करावा. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी रोपवाटिकेत तुषार सिंचनाचा वापर करावा. या सर्व गोष्टींमुळे आपणास लागवडीसाठी दर्जेदार रोपे मिळतील.
लागवडीपूर्वी कुठल्या प्रजातीची कुठे लागवड करावयाची आहे, याचे नियोजन करावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे, खोलीप्रमाणे, खड्ड्यांचे आकारमान ठरवून घ्यावे. खड्डे पावसाळ्यापूर्वी खोदून ठेवावेत. माती उन्हामध्ये तापल्यामुळे अनेक फायदे होतात. दोन- तीन मोठे पाऊस पडल्यानंतर जमिनीत गारवा तयार झाल्यानंतरच लागवड खड्ड्यामध्ये करावी. तत्पूर्वी खड्ड्यात झाडांच्या व खड्ड्याच्या आकारमानानुसार सिंगल सुपर फॉस्फेट, शेणखत, हिरवळीचे खत, कीडप्रतिबंधक पावडर शिफारशीत प्रमाणात मातीत चांगली मिसळावी. खत-मातीचे मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. रोपे लागवडीच्या वेळी ब्लेडने पिशवी अलगद फोडावी. मातीचा गड्डा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. अलगद रोप उचलून खड्डा खणलेल्या ठिकाणी लागवड करावी. रोपाभोवती अलगद बाजूने माती ओढावी. पायाने माती रोपाभोवती अलगद दाबावी. त्यानंतर आळे करून पाणी द्यावे. लागवडीनंतर तणांचे नियंत्रण वेळोवेळी करावे. तणनियंत्रण, खते देणे, गुरांपासून संरक्षण, सावली इ.चे व्यवस्थापन केल्यास वृक्षलागवडीची उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होईल.

झाडांची निवड

1) गावची सार्वजनिक जागा उदा. स्मशानभूमी, बाजाराची जागा इ. ठिकाणी जादा कचरा न करणारी, काटे नसलेली, नेहमी हिरवी असणारी, उंच वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी. या ठिकाणी कदंब, वड, पिंपळासारख्या झाडांची लागवड करावी. 
2) रस्ते दुतर्फा ः छोट्या रस्त्याच्या कडेला सरळ उंच जाणारी झाडे निवडावीत. उदा. पुत्रंजिवा, अशोका, सिल्व्हरओक, सुरू, मोठ्या रस्त्यांसाठी सावली देणारी, फळे, फुले येणारी झाडे निवडावीत. उदा. वड, चिंच, बकुळ, आंबा, बाहावा, कांचन, आपटा, कदंब, सीताअशोक, सुरंगी, सुरमाड, नारळ, करंज, रेनट्री इत्यादींचा यामध्ये समावेश करता येईल. 
3) मंदिर परिसर, धार्मिक स्थळे ः या ठिकाणी मंदिरासाठी उपयुक्त, धार्मिक कार्यासाठी लागणारी, पूजेसाठी वापरण्यात येणारी झाडे यात शमी, बेल, चंदन, वड, उंबर, पिंपळ, नागचाफा, कैलासपती, जास्वंद, केवडा, सोनचाफा, गोरखचिंच, खैर, चाफा, आंबा इ. झाडांची लागवड उपयुक्त होईल. 
4) गायराने पडीक जागा इ. ठिकाणी बहुउद्देशीय वनस्पती यात गुरांना चारा देणारी, जळणासाठी लाकूड देणारी, औषधी, इमारती लाकूड देणारी, जंगली फळझाडे इ. प्रकारची झाडे लागवड करावीत. उदा. अंजनी, बोर, पांगारा, सुबाभूळ, कवठ, इलायती चिंच, आवळा, हिरडा, बेहडा, कडुनिंब, बाभूळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, बिबळा, कॉपरपॉड ट्री, सुरू, निलगिरी, सलई, बेल, पाडळ, टेटू, शिवण, फणस, बिब्बा, मोह, पळस, कोकम, पांढरा कुडा, काळाकुडा, सावर, काटेसावर इ. झाडे लागवड करावीत. 
5) नद्या, पाण्याचे पाट, पाण्याच्या जागा इ. ठिकाणी करंज, उंबर, बांबू, भेंड, फणस, कोकम, ताम्हण, जांभूळ, शिरीष इ. वनस्पतींची लागवड करावी. 
6) शेतामध्ये सावलीसाठी विहिरीजवळ अथवा शेतातील घराजवळ कंदब, सीताअशोक, आंबा, जंगली बदाम, कडुनिंब इ. झाडांची लागवड करावी. 
7) गावामध्ये घराच्या परसबागेसाठी जागेच्या उपलब्धतेनुसार कढीपत्ता, आंबा, लिंबू, पेरू, पपनस, सोनचाफा, हिरवा चाफा, कवठी चाफा, चिकू, फणस, नारळ, नागकेशर इ. फळे, फुले, सौंदर्य, मनमोहकता वाढवणारी झाडे लागवड करू शकतो.