अझोला हा १५ ते २० % प्रोटीन असलेला जलचर वनस्पती. यात असणारे प्रोटीन ची प्रमाणता यामुळे आम्ही अझोला गायीना खाद्य म्हणुन द्यायचं प्रयत्न केला. यामुळे गायीची तब्येत एका महिन्यात सुधारली व तिचा दुधामध्ये वाढ दिसुन आली.

ॲझोलाचे फायदे

  1. पशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्याची बचत
  2. जनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारून आयुष्य वाढते .
  3. ॲझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन यांत वाढ
  4. पक्षी (बदकइमू, लव्ही आदी) खाद्यात मिश्रणस्वरुपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबडयांच्या वजनात वाढ
  5. अंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.
  6. ॲझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.

ॲझोलाचे उत्पादन[संपादन]

ॲझोलाचे उत्पादन घेण्यासाठी झाडाच्या किंवा ५० टक्के शेडनेटच्या कृत्रिम सावलीमध्ये आपल्या गरजेनुसार वाफा तयार करावा. या वाफ्यावर १२o गेज सिलपोलीन प्लॅस्टिक कागद पसरून त्यावर पाण्यात ॲझोला कल्चर टाकावे. ५० टक्के शेडनेटचा वापर करून किंवा झाडाच्या सावलीमध्ये जमिनीत १० फूट लांब, ५ फूट रुंद व ९ इंच खोल या आकाराचा वाफा तयार करावा. यानंतर वाफ्याचा पृष्ठभाग समपातळीत करुन घ्यावा. एका जनावराला दररोज दोन किलो या प्रमाणे ॲझोला खाऊ घालण्यासाठी असे दोन वाफे तयार करावे लागतील. झाडाच्या मुळ्या प्लॅस्टिक कागदमध्ये जाऊन कागद खराब होऊ नये, म्हणून खताच्या रिकाम्या गोण्यांचे आच्छादन वाफ्यामध्ये सर्व बाजूने टाकून यावरून प्लॅस्टिक कागद टाकावा. यानंतर प्लॅस्टिक कागदवरती सर्व कडांना विटांचा थर द्यावा. वाफ्यामध्ये पावसाचे व इतर पाणी जाऊ नये, यासाठी पर्यायी चर काढून घ्यावेत. अशातऱ्हेने वाफा तयार झाल्यावर त्यात १० ते १५ किलो चांगल्या सुपीक काळया मातीचा थर टाकावा. यानंतर १० लिटर पाण्यात ३ ते ४ किलो न कुजलेले ताजे शेण, ३० ते ४० ग्रेम सुपर फॉस्फेट व ४० ग्रॅम खनिज मिश्रण टाकून एकत्रित चांगले मिसळून घ्यावे व तयार झालेले एकजीव मिश्रण खडड्यात अंथरलेल्या मातीवर ओतावे.यानंतर ६.५ ते ७.५ टक्के सामु असलेले स्वच्छ पाणी वाफ्यामध्ये जवळपास चार इंच ते पाच इंच उंचीपर्यंत साठवावे. याप्रमाणे तयार केलेल्या वाफ्यात एक ते दोन किलो ताजे व शुद्ध ॲझोलाकल्चर टाकावे. स्वच्छ सूर्यप्रकाश, २० ते २८ अंश से. तपमान, ७० ते ८० टक्के आद्रता आणि ६.५ ते ७.५ टक्के सामू असलेल्या पाण्यात ॲझोलाची चांगली वाढ होते व योग्य उत्पादन मिळते. जास्त क्षार असलेल्या पाण्यामध्ये ॲझोलाची वाढ होत नाही, म्हणून काळजी घ्यावी.ॲझोलाचे उत्पादन ॲझोला वनस्पतीचे पुनरुत्पादन हे लैंगिक व अलैंगिक अशा दोन्ही प्रकारे होत असल्यामुळे पूर्णपणे वाफा तयार केल्यानंतर १०-१५ दिवसांत ॲझोलाची पूर्ण वाढ होऊन वाफा पूर्णपणे भरला जातो. वाफा पूर्णपणे भरल्यानंतर ३००-३५० ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रति दिवस याप्रमाणात ॲझोलाचे उत्पादन मिळते. यानुसार एका वाफ्यातून १.५ ते २ किलो ॲझोलाचे उत्पादन घेऊ शकतो.