बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित (ॲनारोबिक) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.बायोोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची ज्वलन उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अशा जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅस संकुचित करून लोखंडी सिलिंडरमध्ये भरता येतात.
बायोगॅस उपयो
[संपादन]
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्त्व गोबरगॅस प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.
बायोगॅस हा इंधन म्हणून तयार करता येत असल्याने याची अपारंपारिक उर्जास्रोतात गणना होते. तसेच कचरा निर्मूलन व सांडपाणी शुद्धीकरणामध्ये बायोगॅस हा उप-उत्पादन म्हणून तयार होतो. असे दुहेरी उद्देश साधले जात असल्याने जग बायोगॅसकडे प्रभावी इंधन म्हणून पहात आहे. त्यामुळे बायोगॅसवर आधारित वाहने, रेल्वेगाड्या, तसेच वीजनिर्मिती संच, शेगड्या इत्यादींमध्ये सुधारणांसाठी संशोधन चालू आहे. तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून जास्तीजास्त बायोगॅसची निर्मिती कशी करता येईल यावरही संशोधन चालू आहे.