POULTRY_FARMING

गावठी कोंबडीपालन

Poultry Kaveri Hens

 

गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांना जपावे. पिल्ले आकाराने व वजनाने कमी (25 ते 27 ग्रॅम) असतील, तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये. नाही तर पिल्लांमध्ये मरतूक होते. खासकरून नदीप्रवाहाच्या जवळचा भाग किंवा जास्त थंड हवेच्या ठिकाणी वीजकपातीच्या कालावधीमध्ये मरतुकीचे प्रमाण 50 टक्के अधिक असते. शेतकरी यावर उपाय म्हणून पेट्रोमॅक्‍सच्या साह्याने उष्णता देण्याचा प्रयत्न करतात; परंतु एकंदरीत सर्व विचार केला तरी 10 ते 15 टक्के मर पिल्लांमध्ये निश्‍चितच धरावी लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कोंबड्या बंदिस्त पद्धतीने पाळताना, त्यांना देण्यात येणारी जागा, खाद्य, पाणी अपुरे पडल्यास कोंबड्यांमध्ये मूलतः असलेल्या विकृतीला चालना मिळते.

शेडमध्ये प्रखर प्रकाश किंवा कोंबड्यांची गर्दी जास्त असल्यास कोंबड्या एकमेकांची पिसे उपटतात. काही वेळा एकमेकांना घायाळही करतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पिल्ले 10 ते 12 दिवसांची असताना एकदा व त्यानंतर एक ते दीड महिने वयाच्या कालावधीत चोची बोथट करणे आवश्‍यक आहे. असे केल्यास, बोचण्याचे प्रमाण कमी होते. कोंबडीघरात वायुविजन चांगले असणे आवश्‍यक आहे. वाढीच्या कालावधीत प्रखर उजेड येणार नाही, खाद्याची भांडी बराच काळ रिकामी राहणार नाहीत याची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन असल्यास या विकृतीवर पूर्णपणे मात करता येते. या प्रमाणात कोंबड्या पाळताना गॅस ब्रुडरचा वापर करणे व्यापारी तत्त्वावर अधिक योग्य होईल.

कोंबडीपालनासाठी घराची रचना

कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. कोंबडीघरामध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जमीन मुरमाड असावी. पक्षिघरांसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. पक्षिघराची दिशा ही नेहमी पूर्व – पश्‍चिम असावी. पक्षिघर उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून घर उभारावे. सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ. फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फटू जागा मिळेल अशाप्रकारे घर उभारावे. पक्षिघराची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो. घराचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो. घराची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी. जुने पक्षी गेल्यानंतर ती धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते.

घरांना रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. घराच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी. घरांना लांबीच्या दोन्ही बाजूस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने ओव्हरहॅग पक्षिगृहात येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. घराची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते.

पोल्ट्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान

गेल्या काही वर्षांत देशातील पोल्ट्री उद्योग आधुनिक होत असून यातून चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. इनक्‍युबेटर व हॅचर्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. यामध्ये सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केली जातात. याचा पोल्ट्री व्यावसायिकांनी फायदा करून घेतला पाहिजे.

पोल्ट्रीतील आधुनिकीकरणातून मजुरांवरील अवलंबन कमी होते. पक्ष्यांच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते, गुणवत्ता कायम राखली जाते. अन्न सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वाचे आहे. हॅचरीज, ब्रॉयलर फार्म, ब्रीडर फार्म, खाद्य तयार करण्याचे युनिट, औषधे व लस तयार करणारे युनिट, मशिनरी तयार करणाऱ्या उद्योग समूहांमध्ये आधुनिकीकरण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायात नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये करार पद्धतीने कुक्कुटपालन, खाद्यनिर्मिती असे उद्योग सुरू करणे शक्‍य आहे. पोल्ट्री व्यवस्थापनामध्ये आता संगणकीकरणही वाढते आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवणे सोपे जात आहे.

पोल्ट्री प्रकल्पाची आखणी

1) जागेची निवड – पोल्ट्रीची जागा निवासी भागापासून दूर असावी. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नसावे. पक्ष्यांचे व्यवस्थापन करताना जैव-सुरक्षेचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.

2) पाणीपुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता – चांगल्या प्रतीचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे किंवा पाणी प्रक्रिया संयंत्राच्या वापरानेही हे करता येईल.

3) कायम वीजपुरवठ्याची सोय – विद्युतपुरवठा खंडित झाल्यास पुरेशी क्षमता असलेले जनरेटर किंवा इतर काही पर्यायांची सोय असावी.

4) कमी आर्द्रता – विविध रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आणि पक्ष्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य वातावरण आवश्‍यक असते.

5) तांत्रिक कर्मचारी – प्रशिक्षित, योग्य ज्ञान असलेले कर्मचारी प्रकल्पावर असणे आवश्‍यक आहे.

6) बाजारपेठांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

7) पक्ष्यांचे प्रकार, निवासाची पद्धत आणि प्रकल्पाचा प्रकार यावरून योग्य सामग्रीची निवड करावी.

लागणारी साधनसामग्री

1) केजेस (पारंपरिक प्रकारचे किंवा बॅटरी टाइप)

2) पिण्याच्या पाण्याची योजना (निपल)

3) स्वयंचलित खाद्यपुरवठा

4) पक्ष्यांची विष्ठा गोळा करणारी यंत्रणा

5) अंडी गोळा करण्याची यंत्रणा

6) सायलो आणि खाद्य वाहतूक यंत्रणा

7) अंड्यांसाठीचे काउंटर

8) वायुविजन आणि थंड करण्याची यंत्रणा

9) संगणक प्रणाली

10) उच्चदाब असलेले फॉगर्स

11) गॅस ब्रुडिंग यंत्रणा

12) इनक्‍युबेटर व हॅचर्स (ऑटोमॅटिक व सेमी ऑटोमॅटिक)

13) हॅचरीज वायुविजन यंत्रणा.

पोल्ट्रीमधील आधुनिकीकरण

1) स्वयंचलित खाद्य यंत्रणा

मानवी पद्धतीने खाद्यपुरवठा करताना काही वेळा असमान पद्धतीने खाद्याचे वितरण होते. त्यामुळे पक्ष्यांच्या शरीराच्या वजनावरून बराच मोठा फरक पडतो. वाया जाणाऱ्या खाद्यावर नियंत्रण मिळविणे अवघड जाते. व्यावसायिक ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगामध्ये खाद्याचा खर्च हा एकूण उत्पादनावरील खर्च व वाया जाणाऱ्या खाद्याच्या 60 ते 70 टक्के इतका असतो. याउलट, स्वयंचलित खाद्य यंत्रणेतून अचूक प्रमाणात आणि कमी वेळेत खाद्य संपूर्ण शेडमध्ये एकसमान प्रमाणात दिले जाते. यामुळे पक्ष्यांचे वजन एकसमान राखले जाऊन खाद्य रूपांतरणाचे प्रमाण कमी होते. खाद्य वाया जात नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होते. मजुरांची गरज कमी होते. आजारांच्या संक्रमणावर नियंत्रण मिळविता येते. पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन होऊन अपेक्षित उत्पादन मिळते. 

2) स्वयंचलित पाणीपुरवठा यंत्रणा

नेहमीच्या पाणीपुरवठा पद्धतीमुळे शेडमध्ये पक्ष्यांना देताना पाणी भरपूर प्रमाणात वाया जाते. लिटर ओले होऊन अमोनिया व इतर वायूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे पक्ष्यांचे कार्य बिघडते. आजारी पक्ष्यांची लाळ पाण्याच्या भाड्यात गळल्याने रोगांचे संक्रमण जलद गतीने होते. जर पाणी साठविण्याचे भांडे व्यवस्थित स्वच्छ केले नाही, तर जिवाणूंमार्फत होणारा संसर्ग पक्ष्यांना खूप घातक ठरतो. स्वयंचलित प्रणालीमध्ये निपलने पाणी देण्याची सोय आहे. शेडमध्ये पक्ष्यांच्या उंचीच्या वरच्या पातळीत निपल बसविले जातात. बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी वाया जात नाही. लिटर कोरडे राहाते. वातावरण चांगले राहाते. पक्ष्यांची लाळ पाण्यामध्ये पडत नाही. यामुळे होणारे प्रदूषण थांबले जाते. पाणीपुरवठ्याचे पाइप्स बंद व अपारदर्शक असल्याने जिवाणू अथवा शेवाळामुळे होणारे रोगाचे संक्रमण होत नाही. मजुरांची गरज कमी होते. आजार व संक्रमणावर नियंत्रण राखले जाते. 

फायदे

1) नियंत्रित वातावरणाची शेड तयार केली, तर नेहमीपेक्षा जास्त पक्षी तेवढ्याच आकाराच्या शेडमध्ये सांभाळता येतात. त्यामुळे उभारणी खर्च, वीज, मजूर, नियंत्रण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जागेच्या खर्चाची बचत होते.

2) प्रकल्प क्षेत्रावरील दैनंदिन कामकाजावर सहज लक्ष ठेवता येते, नोंद ठेवता येते.

3) अंड्यांचे, पक्ष्यांचे वजन चांगले मिळते.

4) जैव सुरक्षा व्यवस्थापन चांगले राखले जाते.

5) पिल्लांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि अति आरामदायी वातावरण मिळते.

6) खाद्य वाया जाण्याचे प्रमाण कमी होते

7) खाद्य रूपांतरणाचे प्रमाण कमी होते

8) मालाच्या साठ्याचे व्यवस्थापन चांगले होते

9) कमी जागेत, मोठा प्रकल्प उभारता येतो.

शेड बांधणीचे प्रकार

कमी खर्चात पक्ष्यांसाठी आवश्‍यक शेड उभारता येते. पक्ष्यांच्या योग्य व्यवस्थापनासाठी योग्य वातावरण राखता येते. स्वयंचलित पद्धतीमुळे निवारे सहज वाढविता येतात. भोवतालचे वातावरण वर्षभर साधारण राहत असेल तर आपण ओपन हाऊसचा वापर करू शकतो. अशा परिस्थितीत अतिरिक्त रोधक व वातावरण नियंत्रणाची गरज नसते. काही भागांत लोक “मल्टिस्टोअरेज हाऊसेस’ बांधतात.

पक्ष्यांसाठी शेड बांधताना सॅंडविच तावदानांचा वापर, फायबर रोधकासह द्विस्तरीय कोरूगेटेड शीट्‌स, हॉलो बॉक्‍स, थर्मोकूल इन्सुलेटेड भिंती, ऍसबेस्टॉस शीट तसेच बाजूची भिंत खुली असलेली शेड बांधणे गरजेचे आहे.

इनक्‍युबेटर व हॅचर्सचे प्रकार

दोन्ही बाजूंवर गॅल्व्हनाइज्ड शीट लावलेले इनक्‍युबेटर्स हे पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या भिंतींचे बनविले जातात. पाऱ्याच्या तापमापकाचा उपयोग तापमान नियंत्रणासाठी होतो. गनी रिंग्जचा वापर आर्द्रता नियंत्रणासाठी केला जातो. एम.एस. केबिनमध्ये ट्रॉलीज बाहेर येऊ शकणार नाहीत अशाप्रकारे बसविल्या जातात. त्यामुळे जेव्हा अंडी आतमध्ये घेतली जातात त्या वेळी आतमध्ये योग्य वातावरण राखले जाते. परंतु यामध्ये सर्व नियंत्रण हे मानवी असते; म्हणून माणसाकडून चूक झाल्यास उत्पादनाच्या प्रतीवर परिणाम होऊ शकतो. या सर्व घटकांमुळे इनक्‍युबेशनवर ताण येतो आणि पिल्लांची प्रत खालावते. त्याचबरोबर, होणारे कार्य हे सभोवतालच्या वातावरणावर आणि मानवी कौशल्यावर अवलंबून असते, त्यामुळे शेवटी नफा कमी मिळतो.

गेल्या काही वर्षांत इनक्‍युबेटर व हॅचर्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. काही कंपन्यांनी उच्च-तंत्रज्ञानावर आधारित इनक्‍युबेशन यंत्रणा तयार केली आहे. यामध्ये सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केली जातात. या इनक्‍युबेटरमध्ये लिक प्रूफ स्थिती राखणाऱ्या अधिक घनतेच्या ईपीएस, एबीएस पॅनेल्स केबिन्सचा वापर केला आहे. प्लॅटिनम (PT-500) प्रोब्समुळे तापमान व आर्द्रता नियंत्रणात ठेवली जाते. ऊर्जेमध्ये बचत होते. या सर्व गोष्टींमुळे इनक्‍युबेशनचा ताण कमी केला जाऊन अतिशय चांगल्या प्रतीची पिल्ले विकसित होतात. या पिल्लांचे त्यानंतरचे कार्य इतर पिल्लांच्या मानाने नक्कीच सुधारते. या यंत्रणेला संगणकाची जोड आहे. ज्यामुळे सर्व माहिती साठवली जाते. त्यात बदल करता येत नाही. आधुनिक यंत्रणेमुळे 50 टक्के जागेची, 45 टक्के ऊर्जा आणि मजुरांवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे जरी प्राथमिक गुंतवणूक अधिक असली तरी येत्या काळात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.

अ. वनराजा

    • ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात परसदारातील संगोपनासाठी योग्य, हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालय (ICAR) द्वारे विकसित.
    • आकर्षक पिसारा असलेला दुहेरी फायद्याचा हा बहुरंगी पक्षी आहे.
    • कोंबड्यांच्या सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकार क्षमता आणि मुक्त संख्येत संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम.
    • नियमित आहार व्यवस्थेत वनराजा नर कोंबडे वयाच्या ८ व्या आठवड्यांत मध्यम शरीराचे वजन गाठतात.
    • कोंबडी एका अंडीचक्रामध्ये १६०-१८० अंडी घालते.
    • त्यांच्या तुलनेनं हलक्या वजनामुळं आणि गुडघा ते घोट्यापर्यंतच्या लांब शरीरामुळं, हे पक्षी स्वतःच परभक्षी पक्ष्यांपासून स्वतःचं रक्षण करु शकतात अन्यथा परसदारी पाळलेल्या कोंबड्यांना हा धोका सर्वाधिक असतो.
    • ब. कारी श्यामा (कडकनाथ संकरीत)

      या जातीचे स्थानिक नांव “कालामासी” असे आहे ज्याचा अर्थ काळी मांस असलेली कोंबडी.  मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो.

    • एक दिवसाच्या पिलांचा रंग निळसर ते काळा असतो आणि पाठीवर अनियमित गडद पट्टे असतात.
    • या जातीचं मांस काळे असले आणि पाहायला अयोग्य वाटले तरी ते चविष्ट त्याचबरोबर औषधी असल्याचे मानले जाते.

आदिवासी लोक कडकनाथचं रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांमध्ये वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.

  • मांस आणि अंडी प्रथिनं (मांसामध्ये २५.४७ टक्के) आणि लोह यांनी समृध्द असल्याचे मानले जाते.
  • २० आठवड्यांनी शरीराचं वजन ९२० ग्रॅम
  • लैंगिकदृष्ट्या पक्वावस्थेत वय १८० दिवस
  • वार्षिक अंडी उत्पादन (संख्या) १०५
  • ४० आठवड्यांनी अंड्याचे वजन ४९ ग्रॅम
  • गर्भधारणक्षमता (%) ५५
  • उबवणक्षमता FES (%) ५२

  • FEED CONVERSION RATIO (FCR):- In the United States and Canada, the poultry industry’s standard performance measurement is the feed conversion ratio (FCR). … In other words, FCR equals input divided by output. For broiler producers, an FCR of 1.6 means that their chickens gain 1 kilogram of weight for every 1.6 kilograms of feed consumed.